ठाणे: बिल्डर सूरज परमार आत्मह्त्याप्रकरणी जेलवारी करून आलेले नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची भाजपवारी निश्चित झाली आहे. भाजपमध्ये कोणताही प्रवेश न करता 3 तारखेला सुधाकर चव्हाणला एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. चव्हाण हे ठाण्यात मनसेचे नगरसेवक होते. पण त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन बाहेरच्या रस्ता दाखविण्यात आला होता.

सुधाकर चव्हाणसोबत प्रभागातील इतर तीन वॉर्डमध्येही भाजपकडून उमेदवारी देण्यात आहे. या तीन वॉर्डमध्ये देखील त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजतं आहे. दरम्यान आणखी एका वादग्रस्त चेहऱ्याला भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याची जोरदार चर्चा सध्या ठाण्यात सुरु आहे.

सुधाकर चव्हाण यांचा इतिहास

 

ठाण्यात 90च्या दशकात सुधाकर चव्हाण रिक्षा चालवण्याचं काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. 2012 ला मनसेच्या तिकीटावर त्यांनी शिवाई परिसरातून पालिकेत एन्ट्री केली. मात्र पक्षाची शिस्त न पाळल्यानं मनसेने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.

परिवहन समिती, स्थायी समितीसारख्या अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. पण त्यांच्या राजकीय प्रवासाइतकीच गुन्हेगारी पार्श्वभूमीही गडद आहे.

सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा लोकांना फक्त पक्ष वाढवण्यासाठी का घेतलं जातं आहे?, असा सवाल विचारला जातोय.

उल्हासनगरमध्येही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या निवडणुकीत ओमी कलानीवर सुनील सुखरामानीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीआयडीने ओमीला अटक करुन कोर्टातही हजर केलं होतं. त्यामुळे अशा लोकांच्या जीवावर भाजप स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणार का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत शाश्वत धर्मासाठी राष्ट्रवादीतील अनेक डागाळलेले चेहरे भाजपात घेतले. त्यामुळे संघशिस्तीच्या भाजपला गुन्हेगारांचं वावडं राहिलं नाही का?, की भाजपचा खरा चेहरा आता समोर येतोय?, असा प्रश्न विरोधकांनी विचारला तर आश्चर्य वाटायला नको.

सूरज परमार आत्महत्या प्रकरण:

प्रख्यात बांधकाम व्यावसायिक एमसीएचआयचे (महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज)  अध्यक्ष सूरज परमार (४९) यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी 7 ऑक्टोबर 2015 रोजी दुपारी घडली.

घोडबंदर रोडवरील कॉसमॉस हेवन व्हिलेज या त्यांच्या बांधकाम साईटवरील सँपल प्लॅटमध्ये दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मानेत एक राऊंड फायर केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

संबंधित बातम्या:

भाजपमध्ये आणखी एका वादग्रस्त चेहऱ्याला प्रवेश?


 

सूरज परमार आत्महत्या : चारही नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश