मुंबई : संगीत, क्रिकेट, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारं अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले किरण जोगळेकर यांचं हृदयविकारानं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अमी आणि मुलगा सोहम असा परिवार आहे.


किरण जोगळेकर हे ईझी पास या कंपनीतल्या नोकरीनिमित्तानं साधारण 35 वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या न्यू जर्सीत स्थायिक झाले होते. पण त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीशी आपली नाळ कधीही तुटू दिली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकारण्यांशी जोगळेकर यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. 2010 साली अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना पाचारण करून त्यांनी त्यांची नव्या जगाशी ओळख करून दिली होती. विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ आदी नेत्यांशीही त्यांचा उत्तम परिचय होता.




जोगळेकरांनी मीना नेरुरकर यांच्या साथीनं सुंदरा मनामध्ये भरली आणि महेश काळे यांच्या साथीनं स्वरपश्चिमा या लोकप्रिय कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. जोगळेकर हे तबला, ढोलकी, मृदंग आदी तालवाद्य उत्तम वाजवायचेच, पण त्यांना गाता गळाही लाभला होता. उद्धव ठाकरे यांच्या पाहावा विठ्ठ्ल या आषाढवारीच्या छायाचित्रांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात जोगळेकर यांनी भक्तिगीत सादर केलं होतं.


जोगळेकर यांची तालसंगीतावरची हुकूमत सुंदरा मनामध्ये भरली या अमेरिकी तरुणींच्या लावणीच्या कार्यक्रमातून दिसून आली होती. मंगेशकर भावंडांसह पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित सतीश व्यास आदी दिग्गजांसह त्यांचे स्नेहाचे संबंध होते. मंगेशकर भावंडांपैकी आशा भोसले यांच्याशी दीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांचा परिचय झाला होता. त्याच वेळी आपल्या जीवनात परिपूर्णता आली अशी त्यांची भावना होती. महाराष्ट्रातून कार्यक्रमासाठी अमेरिकेत जाणाऱ्या अनेक गायकांना ते साथ करायचे.




किरण जोगळेकर यांचा जन्म मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात झाला होता. त्यांचं शालेय शिक्षणही शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिरात झालं होतं. एक क्रिकेटर म्हणून ते घडलेही शिवाजी पार्कात. मुंबई क्रिकेटमध्ये ते बॅरेट या टोपणनावानं ओळखले जात.


जोगळेकर यांच्या निधनानं विविध क्षेत्रांमधल्या त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, अभिनेते मिलिंद गुणाजी आदी मान्यवर उपस्थित होते.