मुंबई: अवघा महाराष्ट्र आज फुटबॉल खेळणार आहे. कारण वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयातील तब्बल 10 लाखांहून अधिक विद्यार्थी, एकाच वेळेत फुटबॉल खेळणार आहेत.

विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य लोक, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी होत आहेत.



मुंबई जिमखान्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर, मुंबईचे डबेवाले यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

पुढच्या महिन्यात अंडर 17 अर्थात 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे.  यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या 1 कोटी 10 लाख जणांनी फुटबॉल खेळावा, अशी संकल्पना मांडली होती. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारच्या क्रीडा विभागानं "महाराष्ट्र मिशन, वन-मिलीयन"ची घोषणा केली आहे.

विद्यार्थ्यांनी मैदानात येऊन खेळावं, देशात फुटबॉलला चालना मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.



मुंबईत अंदाजे तीन लाखांहून अधिक मुलं-मुली फुटबॉल खेळणार आहेत.  त्यासाठी शाळा- महाविद्यालयांच्या मैदानाव्यक्तिरिक्त इतर 200 मैदानांची आखणी करण्यात आली आहे.

यापूर्वी विधीमंडळ सदस्य अर्थात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनीही फुटबॉल खेळला होता.