काय आहे घटना?
खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेखने रितीशा नावाच्या दहा महिन्यां चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
"माझी मुलगी अंडर ऑब्झर्व्हेशन आहे. तिची सिटीस्कॅन करुन आणि मग न्यूरोसर्जन डॉक्टर निर्णय घेतील. माझी मुलगी फक्त 9 महिने 25 दिवसांची आहे. पण पाळणाघर मालकिणीला जामीन मिळून ती काल आरामात घरीही गेली, पण मला न्याय नाही मिळाला. त्या आयाने एक-दोन महिन्यात किती मुलांना मागितलाय हे तपासा," अशी मागणी करताना चिमुकलीची आई रुचिता सिन्हा यांना अश्रू अनावर झाले होते.
"पोलिसांना आम्ही सगळं सांगितलं, पण पोलिसांनी आयावर चाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट लावला नाही. पोलिसांनी पाळणाघराच्या मालकिणीला घरी जाऊ दिलं," असा आरोपही चिमुकलीच्या आईने केला आहे.
रुचिता सिन्हा म्हणाल्या की, "मी पण फुटेजचा थोडासाच भाग पाहिला आहे, त्यामध्ये दोन-तीन गोष्टी जाणवल्या. मात्र पोलिसांनी या गोष्टी का नोटीस केल्या नाहीत की, तिथे एवढी मुलं रांगेत झोपलेली आहेत, ती आया माझ्या मुलीला फेकतेय, मारतेय, तरीही त्यातलं एकही बाळ हलत नाही, जागं झालं नाही? एवढं सगळं होत असताना मुलं किमान हलायला तर हवीत. त्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही. मुलांना ड्रग दिलंय का, त्यांना काही खायला दिलं, ज्यामुळे ते बेशुद्ध पडले आहेत, या पॉईंट ऑफ व्ह्यूने पोलिसांनी विचार का केला नाही. फुटेजमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की मुलीला मारहाण होत असताना एकही बाळ हात-पायही हलवत नाही."
वादानंतर मालकिणीच्या नवऱ्याची धमकी
खारघरमधील सेक्टर 10 आणि कामोठ्यात तिचे दोन पाळणाघर आहेत. मी जेव्हा मालकिणीकडे फुटेज घ्यायला गेले तेव्हा आमच्यात वाद झाला. तिचा नवरा मला धमकी देत होता. तुम्ही पोलिसात गेला आहत तर मीही पाहतो. मुलांना काय करुन झोपवलंय की ते हलतही नाही, माझ्या या प्रश्नावर मालकिणीने काहीच उत्तर दिलं नाही.
पाळणाघरची मालकीण धमकावत असल्याची एनसी लिहून द्या, असं मी पोलिसांनी म्हणाले. मात्र याची गरज नसून यावरच कारवाई केली जाईल, असं पोलिस म्हणाले.
'पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही'
रुचिता सिन्हा यांनी सांगितलं की, "मी सात वाजता डे केअर सेंटरच्या बाहेर होते. माझी मुलगी एका कोपऱ्यात बेशुद्ध पडलेली होती. याबाबत विचारलं असताना मालकीण प्रियांका निकम म्हणाली की तिनेच स्वत:ला मारुन घेतलं आहे. घरी आणल्यावर मुलगी काहीच खात नव्हती. तिला बसायला पण येत नव्हतं. तिला रात्रभर कसंतरी ठेवलं. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजताच तिला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
फुटेज चेक केल्यानंतर 23 तारखेला 3.30 वाजता, आया आणि मालकिणीला घेऊन मी स्वत: पोलिस स्टेशनला गेले. पोलिस मला बोलले की, मॅडम तुमची कारवाई झाली आहे. पण जेव्हा थोपटे साहेब येतील, रात्र 9 वाजता त्यांची ड्यूटी सुरु होईल, ते तुमच्याच केससाठी येतील. त्यानंतर माझ्या एफआयआरची प्रक्रिया सुरु झाली.
पोलिसांनी हे प्रकरण थोडं गांभीर्याने घेतलं असतं, म्हणजे साडेचार-पाच वाजल्यापासूनच तपास सुरु केला असता. व्हिडीओ फुटेज पाहिलं असतं. पण त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जा. पोलिसांकडे पूर्ण व्हिडीओ होता, पण तरीही त्यांनी हॉस्पिटलचा इन्ज्यूरी रिपोर्ट मागितला. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलंच नाही. हे सगळं करण्यात दोन-अडीच वाजले.
पोलिसांनी सगळं मराठीत लिहिलं होतं, पण मला मराठी वाचता येत नाही. जेवढंल मला समजलं त्यानुसार एफआयआरमध्ये मालकिणीच्या निष्काळजीपणाची गोष्ट लिहिली होती."
'धोपटे साहेब म्हणाले, ज्यांच्याकडे तक्रार करायचीय करा, मी घाबरत नाही'
"दिवसा 4-4.30 वाजता मी हे पोलिसांना सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 4.30 वाजता एफआयआर दाखल झाला. पण पोलिसांनी प्रियांका निकमला सोडलं होतं. जर तुम्ही तिला सोडलं, तसं मला लिहून द्या, असं मी पोलिसांना म्हणाले. त्यावर धोपटे साहेब म्हणाले, तुम्हाला ज्यांच्याकडे माझी तक्रार करायचीय, त्यांच्याकडे करा, मी कोणालाही घाबरत नाही. मी तिला सोडलं आहे.
बाकी कोणत्या पोलिसांनी धमकावलं नाही, फक्त थोपटे साहेब बोलले की, तुम्हाला ज्यांच्याकडे माझी तक्रार करायचीय, त्यांच्याकडे करा, मी कोणालाही घाबरत नाही," असा दावाही रुचिता सिन्हा यांनी केला.
'माझ्या मुलीला न्याय द्या'
"माझ्या मुलीला ज्यांनी मारलंय, त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी चिमुकलीच्या आईने केली आहे. "या पाळणाघरात पोलिसांचीही मुलं आहेत. माणुसकी दाखवून त्यांनी कारवाई करायला हवी होती. मी स्वत: अडचणीत होती, पण पोलिसांचं वागणं टॉर्चरसारखं होतं," असा आरोपही त्यांनी केला.
पाहा व्हिडीओ