मुंबई : मंत्रिपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंची डोकदुखी वाढली आहे. कारण भोसरी एमआयडीसी जागा खरेदीप्रकरणी हायकोर्टानं एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढले आहेत.

मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं किंवा संबंधितानं फायद्याचा व्यवहार करणं अपेक्षित नाही, असं म्हणत हायकोर्टाने एकनाथ खडसेंना सुनावलं आहे. ऐवढच नाही तर या जागा खरेदीप्रकरणी एमआयडीसी, महसूल विभाग आणि पोलीस विभागाला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणात काय चौकशी केली, अशी विचारनाही पोलिसांना केली आहे.

एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी हेमंत गावंडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टानं खडसेंवर ताशेरे ओढले आहेत.

भोसरी जमीन खरेदीप्रकरण काय आहे?

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले.  परंतु ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.