कल्याण: केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेत मनसेच्या माजी नगरसेवकांचा प्रभाग फोडण्यात आल्याचा आरोप केला. त्या पाठोपाठ आता भाजपनेही शिवसेनेला लक्ष केलंय. प्रभाग रचना फक्त शिवसेनेच्या सोयीसाठी करण्यात आली आहे, आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेने केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. तर शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काहीही झालं तर ते शिवसेनेने केलं, शिवसेनेमुळे झालं असा टीका करणाऱ्यांचा अजेंडा आहे असा पलटवार केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आगामी केडीएमसी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. त्यापाठोपाठ निवडणूक प्रचारापूर्वीच राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडण्यास सुरुवात झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेवरून टीका केली. प्रभाग रचनेत मनसेच्या माजी नगरसेवकांचा प्रभाग फोडण्यात आलेत, प्रभाग रचना तर कधीच झालेली आहे, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले आहेत, जिसकी लाठी उसकी भैस, ज्यांची सत्ता त्यांच्या प्रमाणे प्रभाग रचना झाली, राज्यकर्त्यांनी आपलं अपयश मान्य केलं त्यांना भीती वाटते म्हणून वॉर्ड रचना फोडली जाते अशी त्यांनी टीका केली.
आज भाजपनेही याबाबत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोपांची राळ उठवली. कल्याण डोंबिवली महापालिकेची झालेली ही प्रभाग रचना प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी प्रभाग वाढले पाहिजे त्या ठिकाणी वाढले नाहीत. हे प्रभाग दुसऱ्या ठिकाणी वाढले. संपूर्ण प्रभाग रचना ही कायदेबाह्य आहे. नदी, रस्ते याचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. ही प्रभाग रचना फक्त शिवसेनेची सोयीसाठी करण्यात आली आहे. आपल्याच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला.
आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले की, "भाजपसोबत सत्तेमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीसोबत सध्या सत्तेमध्ये असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज होऊ नये शिवसेनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आता सोयीस्कररित्या विसर पडलाय. काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व क्रांतीकारांचे फोटो लावले. मात्र वीर सावरकारांचा फोटो लावला गेला नाही. एका प्रभागाचे नाव वीर सावरकर रोड होते. तेही बदलण्यात आले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूष करण्यासाठी अत्यंत वाईट प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. हे आम्ही अजीबात होऊ देणार नाही."
याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, "प्रभाग रचना ही महापालिका आणि निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रभाग रचनेबाबत काही वाटत असेल तर त्यावर हरकत घेणार. टीका करणाऱ्यांना काही काम धंदे नाहीत म्हणून काही ही विषय आला कीं हे शिवसेनासाठी आहे, हे शिवसेना करते सर्व श्रेय शिवसेनेला पाहिजे, याच्या शिवाय त्यांना अजेंडाच नाही. त्यामुळे ते काही बडबडत असतात."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha