KDMC Corona Update : गेल्या महिनाभर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतातुर झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आलं आहे. राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावलेला लॉकडाऊन आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे दररोज वेगवेगळे रेकॉर्ड प्रस्थापित करणारी करोनाची रुग्णसंख्या स्थिरावत चालल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.
मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेतली. आधी 2 आकडी असणारी रुग्णसंख्या हळूहळू तीन आकडी आणि मग तीन आकड्यांवरून थेट चार आकडीपर्यंत पोहचली. एप्रिल महिन्यात तर या रुग्णसंख्येने आपले सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढत थेट अडीच हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे साहजिकच कल्याण डोंबिवलीकरांसह महापालिका प्रशासनाच्या उरातही धडकी भरली होती.
मात्र गेल्यावर्षीप्रमाणे केडीएमसी प्रशासनाने कोणत्याही प्रकारे अवसान न गाळता कोरोनाविरोधातील आपल्या उपाययोजना सुरूच ठेवल्या. लॉकडाऊन करणे, टेस्टिंगची संख्या वाढवणे , कॉन्टॅक्ट ट्रेंसिंगवर भर, बेडची संख्या वाढवणे असा उपायोजना करत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवलीतील ही कोविड रुग्णसंख्या 500 च्या आसपास स्थिरावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कल्याण डोंबिवलीत 1 मे रोजी 822 रुग्ण आढळले होते. तर काल मंगळवारी 369 रुग्ण आढळून आले. एवढेच नव्हे तर थेट 25 टक्क्यांवर पोचलेला पॉझिटिव्ह रेटही 9 टक्क्यांपर्यंत खाली आलाय तर या सर्वांचा परिणाम कोविड रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधीवरही झालेला दिसत आहे. महिन्याभरापूर्वी 52 दिवसांचा असणारा हा रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 136 दिवसांवर गेला आहे. तर मृत्यूदर देखील 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
कल्याण डोंबिवलीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य केल्याचं प्रशासनानं सांगितलं. कल्याण डोंबिवलीतील आताची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केडीएमसी प्रशासनातर्फे विविध प्रयत्न सुरू असून येत्या काळात ही रुग्णसंख्या नक्कीच आणखी कमी होईल असा विश्वास प्रशासनाने यावेळी व्यक्त केला आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता त्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असून नागरिकांनी देखील कोरोना नियमाचे पालन करावे असं आवाहन प्रशासनान केलं आहे.
दरम्यान संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच राज्यातही कोरोना व्हायरसचं थैमान सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या आलेखामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला होता. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांसारख्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, आता राज्यातील कोरोनाचा आलेख हळूहळू खाली येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :