Karuna Sharma On Dhanajay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा आरोप लगावले आहेत. धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात डांबले असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. करुणा शर्मा आणि त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मागील वर्षभरापासून धनजंय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. एका पत्रकार परिषदेत रेणू शर्मा धनजंय मुंडेबाबत मोठा खुलासा करणार होती. मात्र, त्यापूर्वीच तिला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक केली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवली. धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे हे खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे हे स्वतः 10 मोबाईल क्रमांक वापरत आहेत. एवढे क्रमांक धनंजय मुंडे कशासाठी वापरत आहेत, असा सवाल करुणा यांनी केला. एखादी वाईट काम करणारी महिलादेखील इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडेच इतक्या मोबाइल क्रमांकाचा वापर का करतात, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात तक्रार देण्यापूर्वी 9 एप्रिल 20 22 रोजी रेणू शर्मा यांनी एक ट्वीट केले होते. धनंजय मुंडे यांचा भांडाफोड करणार असल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र, त्याआधीच रेणू शर्माला खंडणीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबले असल्याचा आरोप करुणा यांनी केला.
धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला. त्यामुळे रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य समोर येईल असे करुणा शर्मा यांनी म्हटले.