तुमची कुवत नसल्यास शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल : उद्धव
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2018 01:20 PM (IST)
छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करुन शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. 'गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त इथे जमतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितलं. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.