मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास करत बेकायदा कुंपण भिंत बांधून भराव केल्याप्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोडला कांदळवन आणि पाणथळ ऱ्हास करुन 3659 चौरसवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आलिशान क्लब बांधला जात आहे.


सीआरझेड क्षेत्रात बांधलं जाणारं या क्लबसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नसताना बांधकाम सुरु असल्याचा आरोप स्थानिक माहितीचे कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी करत आहेत. हा क्लब ज्या जागेवर उभं राहतं आहे ती पाणथळ जागा आहे.

इथे दीड हेक्टरवर कांदळवन होतं. पण ते आता नष्ट करण्यात आलं आहे. याप्रकरणात 2010 पासून ते आजपर्यंत चारवेळा नरेंद्र मेहता यांचा भाऊ विनोद मेहतांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आमदार नरेंद्र मेहतांनी आरोप फेटाळून लावत क्लबसाठी आवश्यक परवानगी घेतल्याचं म्हटलं आहे.