मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झालं अन् क्षणात अनेकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकजण शकडो किलोमीटर पायीच घरी निघाले. तर, काहींनी जीवघेणा प्रवास सुरू केला. यात दोघातिघांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक ठिकाणी अवैध प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली. असे असताना दुसरीकडे सरकारच्या आशिर्वादाने श्रीमंत धेंडांना संचारबंदीत फिरण्याची मुभा मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. लॉकडाऊनमध्येही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालाय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात संचारबंदी असताना सात गाड्यांमधून दिवाण हाऊसिंगशी संबंधित वाधवान कुटुंबातील 23 जण मुंबईतून महाबळेश्वरला पोहोचले, त्यांना गृहमंत्रालयातील सचिवांनी मदत केली, सोबत पत्र दिलं, त्या पत्राविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही माहितीच नसल्याचंही समोर येतंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट केलंय. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही.
वाधवान कुंटुंबीय माझा मित्रपरिवार
गृह मंत्रालयाच्या विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी कुणाच्या सांगण्यावरुन हे पत्र दिलं, हे तपासानंतर समोर येईलचं. मात्र, वाधवान हे माझे कौटुंबिक मित्र असून कुटुंबातील काही कारणामुळे ते खंडाळ्यावरुन महाबेळश्वर प्रवास करणार आहे, अशी पत्राची सुरुवात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पत्रामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज झाल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीही कल्पना नाही. वाधवान कुटुंबातील काही सदस्य नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. असे असताना त्यांना परवानगी देण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, यावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र
वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का?
देशात लॉकडाऊन झाल्यानंतर लाखो लोकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी शकडो किलोमीटर आपल्या कुटुंब कबिल्यासह पायी वाट घरली. सोबत चिल्लीपिल्ली घेत मजल दरमजल करत ही माणसं चालत होती. यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांचा प्रवास राज्यांच्या सीमांवरती संपला. सीमाबंदी असल्याने त्यांना राज्य ओलांडता आले नाही. तर, अनेकानी कंटेनरमधून, दुधाचे टँकरमध्ये, मालवाहू ट्रकला लटकून जीवघेणा प्रवास केला. असा प्रवास करताना ज्यांना पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संचारबंदीत कामानिमित्त बाहेर पडल्याने अनेकांना पोलिसांचा मार खावा लागला. दुसरीकडे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारे वाधवान कुटुंबीय संचारबंदीतही खुलेआम हिंडतंय. नियम आणि कायदा सर्वांनाच सारखा असतो मग वाधवान कुटुबीयांना वेगळा न्याय का? हजारो लोक चालत, बाईकवर, कंटेनरमध्ये लपून प्रवास करत असताना वाधवान कुटुंबीयांना राजरोस कशी परवानगी मिळते? कसलीही इमर्जन्सी नसताना महाबळेश्वरच्या सुटीसाठी ते लॉकडाऊन संपेपर्यंत थांबू शकत नाहीत का? अजूनही त्यांच्यावर महाबळेश्वर मध्ये गुन्हा दाखल का झाला नाही? असे प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख