मुंबई : केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जिओच्या नव्या सेट टॉप बॉक्सवरून रिलायन्सवर टीका केली. रिलायन्स जिओने सुरु केलेल्या नव्या सेट टॉप बॉक्सच्या घोषणेवरून केबल चालकाच्या व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची चिन्ह आहे.


रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात सर्वात वेगानं संपूर्ण भारतात नेटवर्क पसरवलं. जिओनं आता सेट टॉप बॉक्स बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीनं सर्वच केबल चालकांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सला विरोध केला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केबल चालकांना मार्गदर्शन केलं.

"जिओच्या नवीन सेट टॉप बॉक्समुळे केबल व्यावसायिकांच्या रोजगाराला फटका बसत आहे. सुरुवातीला सेवा फुकट देऊन नंतर त्यावर चार्जेस आकारले जातात, ही फसवणूक आहे. जर तुम्हाला केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

देशात सध्या सगळीकडे डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. मात्र रोजी रोटी डाउनलोड करता येत नाही. घरात रोजी रोटी नाही आणि डिजिटल इंडियाचा नारा कसला देताय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप सरकारला विचारला.

वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. "मी केबल ऑपरेटर्सना बळ द्यायला आलो आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सरकारनेही डिजिटल इंडिया सुरु केलं आहे. या डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत आहे, त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होत आहेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेली अनेक वर्ष राबून केबल चालकांनी हा व्यवसाय उभा केला आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय मी जाऊ देणार नाही. शिवसेना केबल चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.