कल्याण : कार्यालयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एका एजंटने मारहाण केल्याची घटना कल्याण आरटीओ कार्यालयात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एनसी दाखल केली होती. दरम्यान, आज कल्याण आरटीओमध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला. मारहाण करणाऱ्या विरोधात कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला मच्छिंद्र केणे हा कार्यालयातच थुंकला. यामुळे कल्याण आरटीओमध्ये कार्यरत असलेले लिपिक मनीष जाधव यांनी त्याला हटकले आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या केणे याने मनीष यांना धमकी दिली. इतकेच नव्हे तर कार्यालयीन कामकाज आटोपून संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीनुसार एनसी दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेमुळे कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आज कल्याण आरटीओमध्ये मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कल्याण आरटीओमधील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं. अशा घटना सतत घडत असल्याने सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :