कल्याण : गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काल कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे काल कल्याणजवळच्या मुठवळ गावात आले होते. हावरे बिल्डर्सच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सुरेश हावरे यांनी बोलताना चंद्रकांत दादा येणार म्हणून आठ दिवसात गावातला कच्चा रस्ता सिमेंटचा झाल्याचं सांगितलं. त्यावर चंद्रकांत दादांनीही उघडपणे मंत्री असल्याचे हे फायदे असल्याचं वक्तव्य केलं. "मंत्री गावात येणार असले, की सूचना न देताही कामं होतात.. हावरेंनी सांगितल्याप्रमाणे आठ दिवसात गावातला रस्ता झाला.. मंत्री असल्याचे हेच फायदे असतात", असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिवाय राज्यात दहा दहा वर्ष खड्डे पडणार नाहीत, असे रस्ते तयार करणार असल्याचंही ते म्हणाले.


मात्र असं असेल, तर मंत्री ज्या गावात येतील, तिथलेच रस्ते सरकारी यंत्रणा तयार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे राज्यभरात खराब रस्त्यांनी जनता त्रस्त असून कल्याणमध्येच खराब रस्त्यांनी पावसाळ्यात पाच बळी घेतले आहेत. त्यामुळे आता मंत्री येणार असतील, तरच जनतेला चांगले रस्ते मिळतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.