रामकीसन शिंदे हा भामटा कल्याण पूर्व भागात कॉलेज किंवा क्लासला जाणाऱ्या युवकांना एकटं गाठायचा. त्यानंतर तू माझ्या प्रेयसीला फोन का करतो? किंवा माझ्या बहिणीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? अशी विचारणा करत त्यांना धमकवायचा.
धमकावल्यानंतर घाबरलेल्या या विद्यार्थ्यांना तो बाजूला घेऊन जात दमदाटी करून त्यांचे मोबाईल पाहण्यासाठी घ्यायचा. मोबाईल हातात पडल्यानंतर तो तिथून पोबारा करायचा. अशाप्रकारे त्याने कल्याण पूर्व भागात सलग 25 ते 30 गुन्हे केल्याने पोलीस त्याच्या शोधात होते.
पोलिसांनी या भामट्याचा शोध सुरु केल्यानंतर पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले. या फुटेजच्या सहाय्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. चोरलेले मोबाईल त्याने मुंब्र्यात जाऊन विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं.
रामकिसनने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मुंब्रा इथून शोएब शेख, सलीम अन्सारी आणि शहानवाज सय्यद या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 25 मोबाईल जप्त केले आहेत. त्यांनी यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का? याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत.