मुंबई : वेस्टर्न कमोडऐवजी इंडियन टॉयलेटचा वापर करा, असं आवाहन बोहरा समाजाचे आध्यात्मिक गुरु सैयदना आलीकदर मुफद्दल मौला यांनी समाजातील लोकांना केलं आहे. जर तुमच्या घरात वेस्टर्न स्टाईलचं टॉयलेट असेल तर ते इंडियन स्टाईलमध्ये बदलून घ्या, असं आवाहन नागरिकांना केलं जात आहे.


चांगलं आरोग्य आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मौलांचं म्हणणं आहे. बोहरा समाजातील नागरिकांना मशिदीद्वारे या संदेश दिला जात आहे. लोकांना याचे फायदे आणि नियम-कायदे सांगितले जात आहेत.

आदेशावरुन मौलाना समाजात दोन गट
मात्र मौलांच्या या आदेशानंतर बोहरा समाज दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एक गट या आदेशाच्या बाजून आहे, तर दुसरा गट त्याचा विरोध करत आहे. हा संदेश जबरदस्तीने थोपवण्यावर बोहरा समाजाच्या काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मशिदीमार्फत घराघरात जाऊन तपासणी
टॉयलेटचं हे बंधन फक्त मुंबईतच नाही तर अमेरिका आणि युरोपमध्ये असलेल्या बोहरा सामाजाच्या लोकांपर्यंतही पसरवलं जात आहे. मशिदीमार्फत लोकांच्या घराघरात जाऊन तपासणी केली जात आहे. लोकांना फॉर्म दिले जात आहेत आणि त्यांच्या घरी जाऊन टॉयलेटची तपासणी करत आहेत, असं सूरतमधील एका व्यक्तीने सांगितलं.

संस्कृतीचा दाखला
या प्रकरणी समाजाच्या प्रवक्त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "वेस्टर्न टॉयलेटचा वापर करणं हे आमच्या संस्कृतीच्याविरोधात आहे. इंडियन स्टाईलचं टॉइलेट आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी ही मोहीम सुरु केली आहे. आरोग्यविषयक अडचणींमुळे इंडियन टॉयलेटचा वापर करु शकत नाही, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही." परंतु वयोवृद्धांसाठी इंडियन टॉयलेटचा वापर कठीण असल्याची बाबही त्यांनी मान्य केली.