मनसेचं आंदोलन आणि उच्च न्यायालयाचे आदेश या पार्श्वभूमीवर सर्वच महापालिकांनी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. उल्हासनगर महापालिकेनेही आठवडाभरापूर्वी अशीच कारवाई करत एक हातगाडी तोडली. यावेळी दुसरा एक फेरीवाला तिथे गयावया करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला झाला आहे.
वास्तविक जो फेरीवाला गयावया करताना दिसतोय त्याला फक्त दंड आकारुन सोडण्यात आलं, मात्र यानंतर कारवाईत खो घालण्यासाठी पालिका अधिकारी निष्ठुर असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे मनसे महापालिका अधिका-यांच्या पाठीशी उभी राहिली असून ज्यांना फेरीवाल्यांचा पुळका असेल, त्यांनी या फेरीवाल्यांना घेऊन यूपी-बिहारला निघून जावं, असं मनसेनं म्हटलं आहे.
मनसेच्या वतीनं आज पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसंच कारवाईदरम्यान कुणी मध्ये आल्यास मनसे अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असं म्हणत मनसेनं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला.