कल्याण : कल्याणचा खडेगोलवली परिसर वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. दूधकर निवासात वास्तव्यास असणाऱ्या लीलाबाई दूधकर आणि कमलाबाई दूधकर या दोन वयोवृद्ध महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

 
60 वर्षीय लीलाबाई आणि 70 वर्षीय कमलाबाई या नात्याने नणंद भावजय होत्या. संध्याकाळी त्यांना भेटायला आलेल्या नातेवाईकांना या दोघी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तात्काळ याबाबत कोळसेवाडी पोलीस स्थानकात माहिती दिली.

 
दरम्यान, घरातील सामान अस्ताव्यस्त असल्यानं ही हत्या चोरीच्या उद्देशानं झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र या दुहेरी हत्येमागे दुसरा काही हेतू होता का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.