कल्याण: डोंबिवली एमआयडीसी रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीवरुन आता शिवसेना-मनसे चांगलीच जुंपली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजूर केल्याचे बॅनर शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते. या बॅनरवर टीका करणारा एक पोस्ट कार्ड फॉरमॅटमधील मजकूराचा बॅनर मनसेच्या शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीत झळकला आहे. मनसेच्या या टिकेला आत्ता शिवसेना काय उत्तर देणार याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीच्या मंजुरीचे श्रेय घेत शिवसेनेच्या वतीने त्या परिसरात बॅनर लावण्यात आले होते. या निधीच्या माध्यमातून एमआयडीसी मधील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असा दावाही करण्यात आला होता. मात्र पावसाळा लोटला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे.
शिवसेनेच्या वतीने निधी मंजूर होताच बॅनर झळकला. त्या झळकलेल्या बॅनरवर टीका करणारा एक पोस्ट कार्ड फॉरमॅटमधील मजकूराचा बॅनर मनसेच्या शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीत झळकला आहे. या पोस्टकार्ड फॉरमॅटवरील बॅनरवर मनसेने गंमतीशीर मजकूर लिहिला आहे. त्यामध्ये लिहिलंय की, श्री श्रेयस निधी मंजूरकर यांस कोपरापासून हात जोडून नमस्कार. सालाबाद प्रमाणे एमआयडीसीत रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. कधी तरी झालेला रस्ता सुद्धा दाखवा. आपले कृपाभिलाषी त्रासलेले डोंबिवलीकर.
मनसेच्या बॅनरवर असं उपहासात्मक लिहण्यात आले आहे. होर्डिग आणि बॅनरबाज मंडळी डोंबिवली परिसर असा पिनकोडचा उल्लेख केलेला आहे. या पोस्टकार्डवर जो शिक्का मारला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा वाघ दाखविण्यात आला आहे. हा बॅनर डोंबिवलीकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kalyan: इमारत पुनर्विकासप्रकरणी बांधकाम परवानगीमधील अनियमितता, केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा
- डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी उद्योजकांना भरावा लागणार कर? MIDCकडून प्रस्ताव
- कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधेच्या गर्तेत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा