कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सुरू असून यात प्रत्येक खड्डा भरण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च केले जात आहेत. या अफाट खर्चाने खड्डेभरणीत सोन्याच्या विटा वापरल्या जातायत की काय? असा उपरोधिक सवाल विचारला जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरांमध्ये विक्रमी खड्डे पडले होते. त्यामुळं खड्ड्यांवर रॅप सॉंग, खड्ड्यांचं मनोवृत्त सांगणारे व्हिडीओ सुद्धा कल्याण डोंबिवलीकरांनी तयार केले. हे खड्डे बुजवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 17 कोटी रुपये मंजूर केले होते. यंदा लांबलेला पावसाळा संपताच खड्डेभरणीचं काम हाती घेण्यात आलं. मात्र या खड्डेभरणीच्या कामाची माहिती जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवली आणि खड्डेभरणीचा झोल उघड झाला. कारण डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यंत विस्तारलेल्या केडीएमसी क्षेत्रात यंदा 6 हजार 143 खड्डे पडले होते. यापैकी शहरातील 5 हजार 283 खड्डे बुजवण्यात आले असून त्यासाठी ठेकेदाराला 11 कोटी 90 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ही आकडेवारी पाहून हिशोब केल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसीनं डांबर वापरलं? की सोन्याच्या विटा वापरल्या? असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे याच कथित भ्रष्टाचारावरून मनसेनं नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही मनसेला पाठिंबा देत शिवसेनेला धारेवर धरलं. खड्डेभरणी सुरू असली, तरी शहरातील खड्डे मात्र बुजवल्याचं दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याचं भाजपचे गटनेते विकास म्हात्रे यांनी सांगितलं. तर या सगळ्यात निश्चितपणे मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या असून त्यापूर्वीच शिवसेना भाजपातील संबंध स्थानिक पातळीवरही ताणले जात असल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतं आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण डोंबिवलीत एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपयांचा खर्च!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2019 05:55 PM (IST)
हिशोब केल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसीनं डांबर वापरलं? की सोन्याच्या विटा वापरल्या? असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -