डोंबिवली : एका रिक्षाचालक महिलेने आपल्या रिक्षाचालक प्रियकारासह आपल्या पतीची हत्या त्याचा मृतदेह बदलापूर कर्जत रोडवरील मोरीत फेकून दिल्याची घटना डोंबिवलीत उजेडात आली आहे. आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेचे बिंग फोडले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ मारी रविंद्र राम व सनीकुमार सागर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.  मयत प्रवीण पाटील हा खाजगी कंपनीत नोकरीला होता तर लक्ष्मी रिक्षा चालवायची तिथेच तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते.


डोंबिवली मानपाडा येथे राहणारा प्रवीण पाटील हा 4 जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बरेच दिवस उलटूनही प्रविणचा शोध लागत नव्हता. त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत असताना कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाला लक्ष्मीवर संशय बळावला.


पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ मारी रविंद्र राम व त्याचा मित्र सनी सागर याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. अरविंदचे लक्ष्मी सोबत अनैतिक प्रेमसबंध होते. याची कुणकुण लक्ष्मीचा पती प्रविणला लागली. 


या कारणावरून प्रवीण व लक्ष्मीमध्ये वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी प्रवीणचा काटा काढायचं ठरवले. 2 जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रवीण घरी असताना अरविंद व सनी घरी आला त्यानी प्रवीणला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या कृत्यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह रिक्षाने नेऊन बदलापूर कर्जत रोडवरील मोरीखाली टाकून दिला होता. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रवीण बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र प्रवीणच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली व कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा उलगडा करत याप्रकरणी लक्ष्मी अरविंद व त्यांचा साथीदार सोनी याला देखील अटक केली.