ठाणे : मेट्रो 5 चा भूमीपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र या मेट्रोच्या या प्रस्तावित प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी विरोध दर्शवला आहे. मेट्रो 5 चा प्रस्तावित मार्ग प्रवाशांसाठी फायदेशीर नाही, असा दावा त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या मेट्रोमार्गाच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो प्रकल्पाचा सध्याचा मार्ग कापूरबावडीवरुन कोल्हेर, कशेरीमार्गे धामणकर नाका ते कल्याण एपीएमसी मार्केटपर्यंत जातो. मात्र या भागात प्रवासी संख्या फार कमी आहे. तर दुसरीकडे कळवा, मुंब्रा, दिवा, कौसा, ठाकुर्ली, कोपर, डोंबिवली या भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या मार्गातून मेट्रो गेल्यास या ठिकाणच्या नागरिकांना जास्त फायदा होईल आणि मेट्रोच्या उत्पन्नातही तुलनेने वाढ होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

सध्याचा मार्ग भाजपचं प्राबल्य असलेल्या भिवंडी परिसरातून जात आहे. त्यामुळे या मेट्रोच्या कामातही राजकारण केलं जातं असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाचा घाट ही मतदारांची फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.