रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस कशी वाढत चालली आहे, याचं आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहेत. ही घटना काल (9 ऑक्टोबर) संध्याकाळची आहे. कल्याणच्या वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आशा गावंडे या काल संध्याकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रणाचं काम करत होत्या. यावेळी नागेश अल्वागिरी हा रिक्षाचालक गणवेश न घालता रिक्षा चालवत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी त्याला थांबवून लायसन्स मागितलं. मात्र यावेळी थांबण्याऐवजी नागेश याने रिक्षा भरधाव वेगात कल्याण कोर्टाच्या दिशेनं दामटवली. यावेळी वाहतूक पोलीस आशा गावंडे यांनी मात्र रिक्षा धरुन ठेवत असल्याने त्या रिक्षेसोबत फरपटत गेल्या आणि मोठा गोंधळ उडाला.
ही घटना पाहून तिथे उपस्थित अनेकांनी रिक्षेच्या मागे धाव घेतली आणि गावंडे यांची सुटका केली. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षाचालक नागेश अल्वागिरीलाही पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण स्टेशन परिसरात यापूर्वीही रिक्षाचालकांच्या मुजोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र तरीही रिक्षाचालकांना शिस्त लावण्यात पोलीस कमी पडत असून त्यामुळे अशाप्रकारे पोलिसांवरच हल्ले करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेली आहे.
कल्याण आरटीओअंतर्गत आजमितीला तब्बल 54 हजार अधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत असून त्यापैकी 24 हजार रिक्षा या एकट्या कल्याणमध्ये आहेत. तर अनधिकृत रिक्षांची संख्याही मोठी आहे. मात्र या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी कुठलीही कडक पावलं उचलली जात नसल्यानं मुजोरीचे प्रकार वाढत चाललेत. याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे.