मुंबई : मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलने मुंबईकरांची हक्काची मोकळी जागा हडपल्याचा प्रकार समोर येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलकडून नागरिकांसाठी राखीव असलेल्या सुमारे एक लाख चौरस फूट मोकळ्या जागेचे हस्तांतरणच करण्यात आलेले नाही. 2005 पासून या जागेचा गैरवापर होत असल्याचा आरोप सुधारसमिती सदस्य अभिजीत सामंत यांनी केला आहे.


या  गैरवापरामुळे महापालिकेचे आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुधार समितीने दिले आहेत. जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलच्या उभारण्यासाठी ताज फ्लाइट किचनकडून जागा उपलब्ध झाली होती.  या जागेपैकी 20 टक्के (एक लाख चौरस फूट) जागा मोकळी ठेवून त्यावर उद्यान साकारुन ती नागरिकांना विनामूल्य वापरासाठी खुली ठेवणे बंधनकारक होते.

या 20 टक्के मोकळ्या नागरिकांच्या प्रवेशाबाबत एक फलक हॉटेलने बाहेर लावला आहे. प्रत्यक्षात या जागेचा वापर नागरिकांसाठी होत नसून त्यात हॉटेल व्यवस्थापनाने सांडपाणी फेरप्रकिया प्रकल्प सुरु केला असून त्या जागेचा वापर हॉटेल मालक स्वतःच्या कामासाठी करत असल्याचं समोर आलं आहे. अद्याप या जागेचा ताबा महापालिकेकडे दिलेला नाही. तसेच या जागेत जाण्यासाठी नागरिकांना प्रवेश ठेवलेला नाही.

ही जागा अद्याप महापालिकेला हस्तांतरित झाली नसल्याने हॉटेल मॅरिएटकडून पालिकेचे 2005 पासून दरवर्षी अंदाजे 1.25 कोटी रुपयांचे तर पंधरा वर्षात सुमारे वीस कोटीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंदीमुळे पालिकेच्या उत्पन्नावर सध्या परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत पालिकेला दरवर्षी किमान एक कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या उत्पन्नाला मुकावे लागत असल्याचं चित्र आहे.