नवी मुंबई : लॉकडाऊन मुळे घराचे स्वप्न भंग होण्याची वेळ सिडको घर लाभार्थ्यांवर आली आहे. गेल्या वर्षी सिडकोने काढलेल्या घरांच्या मेगा लॉटरीत 15 हजार जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले होते. येत्या 30 जुनला पैसे भरायची शेवटची तारीख आहे. मात्र लॉकडाऊनमुळे होमलोनची प्रक्रिया पूर्ण न करता आल्याने अनेकांच्या हातातून घर जाण्याची भीती आहे. सध्याची परिस्थिती पाहता सहा महिने मुदतवाढ द्यावी, मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.


सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल भागात स्वस्तात 15 हजार घरांची लॉटरी गेल्या वर्षी काढण्यात आली होती. घणसोली, खारघर, तळोजा, रसायनी या भागात अल्प आणि अत्यल्प गटातील लोकांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. सिडकोचे घर मिळालेल्या लाभार्थ्यांना घराचे पैसे भरण्यासाठी येत्या 30 जुनला शेवटची तारीख आहे. फेब्रुवारी महिन्यात असलेली शेवटची तारीख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवून ती 30 जून केली होती. मात्र गेल्या तीन-चार महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने कोणत्याच प्रकारची बॅंकांची कामे झालेली नाहीत.


घराच्या कर्जासाठी बॅकांकडे सुरू झालेली प्रक्रिया कोरोनामुळे बंद झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पगार कमी झाले आहेत. काही जणांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे सिडकोच्या घराचे लाखो रूपये भरायचे कसे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. अत्यल्प गटासाठी 18 लाख तर अल्प उत्पन्न गटासाठी 25 लाख भरायचे आहेत.


सिडकोने गेल्या वेळेस मुदत वाढ दिली असली तरी त्याला लाखो रूपये दंड लावला आहे. सिडको सावकाराला लाजवेल असा दंड आकारत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिडकोला मुदत वाढीचे आदेश देताना दंडाची रक्कम माफ करण्याचा आदेश द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये लक्ष घालून पैसे भरण्याची मुदत वाढवून घर लाभार्थ्यांना दिलासा देतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.


मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळही ऑनलाईन मिळणार; जून अखेरपर्यंत संगणकीय प्रणाली सुरु होणार