मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर मशीद बंदर ते सँड हर्स्ट रोडदरम्यान पादचारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

6 तासांच्या ब्लॉक कालावाधीत मशीद बंदरच्या जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात येईल. ब्लॉक काळात प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-वडळा आणि सीएसएमटी-भायखळादरम्यान जादा बसेस सोडण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत तर हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.14 वाजता सीएसएमटीहून कल्याणला जाणारी धिमी लोकल शेवटची असेल. 10.22 वाजता भायखळ्याहून सीएसएमटीला जाणारी धिमी लोकल शेवटची असेल. तसेच सीएसएमटी येथून पनवेलसाठी सकाळी १०.१० वाजता सुटणारी आणि वडाळा रोड येथून सीएसएमटीला जाणारी १०.२८ वाजताची लोकल शेवटची असेल.