मुंबई : दसऱ्याला भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या 14 आरोपींना 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना आज मुलुंड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली.
काय आहे प्रकरण? दसऱ्यानिमित्ताने भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं जाणार होतं. तसा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारी भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले.
या राड्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केलं. किरीट सोमय्या यांच्यासह प्रकाश मेहता, राम कदमही सहभागी झाली होते. सुरुवातीला 5, त्यानंतर 8 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्या सगळ्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र शिवसैनिकांनी कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.