मुंबई : बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी जमा झालेली गर्दी एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली होती. वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला आहे. एबीपी माझा आणि मी राहुल कुलकर्णी अजूनही आमच्या बातमीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया राहुल कुलकर्णी यांनी जामीनावर बाहेर आल्यानंतर दिली. दरम्यान, कालपासून अनेक पत्रकार संघटनांनी राहुल कुलकर्णी यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भूमिका मांडली.
कोरोनाव्हायरस आपण सगळेजण संयमाने सामना करत असताना पत्रकारांनीही संयमाने वागले पाहिजे अशीच टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची भूमिका आहे. या काळामध्ये पत्रकारिता करताना कुठेच जनभावना उफाळून येतील, अशा प्रकारच्या बातम्या होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत आणि वास्तववादी चित्र मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, राहुल कुलकर्णी यांना झालेली अटक याचे ही समर्थन करता येणार नाही. कारण पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित असायला हवे. त्यांनी केलेले वार्तांकन हे रेल्वेच्या झालेल्या बैठका सुरू असलेले रिझर्वेशनचे बुकिंग आणि त्याच्या हाती आलेल्या कागदाच्या आधारे केले आहे. त्यामुळे अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे पत्रकारितेवर अन्याय करणारे आहे.
अटक ते जामीन... राहुल कुलकर्णी यांच्याकडूनच ऐका घटनाक्रम
युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आम्ही सरकारी यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अशावेळी सरकारनेही आमचे विचार स्वतंत्र, व्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणू नये. ते अबाधित राहिले पाहिजे. बांद्रा येथे जी घटना घडली त्यामागचे खरे सूत्रधार कोण हे पोलिसांनी जरूर जनतेसमोर आणावेत. या कार्यात माध्यमांकडे जे जे साहित्य उपलब्ध आहे त्या सगळ्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, एकट्या राहुल कुलकर्णीला जबाबदार धरून अशा प्रकारचे केलेले कृत्य आम्हाला मान्य नाही, आम्ही सर्व राहुल कुलकर्णी यांच्या पाठीशी उभे आहोत. या अटकेचा निषेध करतो.
Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर
अटकेचा निषेध
काही कारणास्तव एकटा बाहेर पडले तरी पोलीस कारवाई करतात मग इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण कशी काय झाली असा प्रश्न महाराष्ट्र पंत्रकार संघ मुंबईच्या वतीने विचारण्यात आला आहे. जर एबीपी माझाच्या बातमीमुळे गर्दी झाली असती तर ती राज्यभर व्हायला हवी होती. फक्त बांद्रा रेल्वे स्थानकाबाहेरचं का? राज्य पत्रकारसंघ या अटकेचा निषेध करत आहे. केंद्रीय माहिती प्रसारण केंद्राचे आदेश असतानाही राज्यभरात आठ पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण झाली आहे. ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन यांनी देखील या अटकेचा निषेध केला आहे. हा प्रकार पत्रकाराची गळचेपी करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने देखील या अटकेचा निषेध केला आहे.
#ISupportRahulKulkarni | बातमी, अटक आणि जामीन...राहुल कुलकर्णी यांच्याकडूनच ऐका संपूर्ण घटनाक्रम