मुंबई : खोटे कागदपत्र लावून मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यामध्ये काम मिळवणाऱ्या चौघांविरुद्ध माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चौघांनी मुंबई महानगरपालिकेत कामावर लागण्यासाठी एका एजंटला 1 ते 2 लाख रुपये दिले होते आणि त्या एजंटने खोटे कागदपत्र तयार करुन या चौघांना महानगरपालिकेत स्वीपर म्हणून कामाला लावले.


मुंबई महानगरपालिकेमध्ये चतुर्थश्रेणी कामगार ज्यावेळेस रिटायर होतात किंवा त्यांचे कामावर असताना निधन होते, तेव्हा त्यांच्या पाल्यांना मुंबई महानगरपालिकेत कामावर रुजू केले जाते. अविनाश कुंचीकुर्वे, आशिष बाबरिया, हरमेश खाकरीया, गणेश कुंचीकुर्वे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांना एकाच महिलेच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीमध्ये स्वीपर म्हणून रुजू करण्यात आलं होतं. हे चौघेही महापालिकेच्या जी वॉर्डमध्ये कामावर होते.


महानगरपालिकेच्या अजून दोन वॉर्डमध्ये अशाच प्रकारे नियमबाह्य पद्धतीने कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आले होते. त्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. मात्र कोविड 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं.


प्रकार कसा उघडकीस आला?


जानेवारी 2019 मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या इंटरनल ऑडिटमध्ये ही बाब समोर आली की चार जणांनी 10 सप्टेंबर 2018 ते 19 जानेवारी 2019 पर्यंत आपला पगारच घेतला नाही. त्यावेळी पुढे तपास करण्यात आला, त्यात कागदपत्र अपुरे असल्याचं निदर्शनास आलं. मात्र अधिक तपास केल्यानंतर दीपिका कांबळे या महिलेचे नातलग दाखवून चौघांचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र या चौघांचाही त्या महिलेशी काही संबंध नव्हता. तसेच त्यांनी जे कागदपत्र जमा केली होती, त्याच्यावर खोटे डिस्पॅच नंबर आणि सह्या होत्या.


मुरगन कोको स्वामी नावाचा एजंट अशा पद्धतीने बीएमसीमध्ये कामाला लावत होता. त्याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत. तसेच अशा प्रकारचे गुन्हे मुंबईत अजून कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत का? याची सुद्धा पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणांमध्ये आता कोणाला अटक करण्यात आलेली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.