मुंबई : राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं हे सरकार कौरवांचं सरकार आहे. कौरवांना ज्याप्रमाणे कुठलीही नितीमत्ता नव्हती, यांनाही कुठलीच नितीमत्ता नाही. कौरावांचं राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचं राज्य येईल, अशा कठोर शब्दात नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


नारायण राणेंनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं. भाजपसोबत युती करुन निवडून यायचं आणि संसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत थाटायचा, ही बेईमानी आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी शिवसेनेमुळे भाजपचे 105 आमदार आले, असं केलेलं वक्तव्य कुणालाही पटणारं नाही, असंही नारायण राणेंनी म्हटलं.


शरद पवार आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीवरही टीकास्त्र सोडलं. सामनातून आतापर्यंत शरद पवारांविरोधात बातम्या येत असताना आता त्यांची मुलाखत घेतली जात आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीतून राज्याला कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या असत्या तर बरं झालं असतं. सामनातून शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत हेच मुळात राजकारण आहे. कारण सामनाने जेवढी शरद पवारांवर टीका केली आहे तेवढी कुणीच केली नाही, असा नारायण राणेंनी म्हटलं.