मुंबई : कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, याचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील इडी कोर्टात 'जेजे'चे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलं आहे.


दोन नोव्हेंबर रोजी जे जे हॉस्पिटलने छगन भुजबळांचा ताबा आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केलं गेलं याच्याशी जे जे हॉस्पिटलचा काहीही संबंध नसल्याचा दावा तात्याराव लहानेंनी केला आहे.

तसंच आपण कोर्टाचा कुठेही अवमान केला नाही, किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही, असंही तात्याराव लहाने यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे.

सध्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ हे वारंवार तब्येतीच्या कारणास्तव जेलबाहेर रुग्णालयात रहात आहेत. भुजबळांची तब्येत ठणठणीत असून जे. जे. रूग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने छगन भुजबळ सतत तब्येतीच्या कारणास्तव जेलबाहेर रुग्णालयात रहात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांच्या तब्येतीबाबत ज्या ज्या टेस्ट केल्या गेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स अंजली दमानिया यांनी सेशन्स कोर्टात सादर केले. भुजबळांचे रिपोर्ट्स पाहिले तर ते विराट कोहली इतके फिट आहेत असा युक्तीवाद अंजली दमानिया यांनी केला. दोन ते तीन दिवसात केल्या जाणाऱ्या टेस्ट्ससाठी छगन भुजबळ महिनाभर जे. जे. किंवा बाँम्बे हॉस्पिटलमध्ये कसे काय राहतात असाही युक्तिवाद अंजली दमानिया यांनी केला.