मुंबई : मुंबईतील उपनगरी लोकलवर पश्चिम रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे ही तुलना कायम पाहायला मिळते. मात्र आता चक्क मुंबई हायकोर्टानेच याबाबत एक निरीक्षण नोंदवलं आहे. हल्ली पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुली मध्य रेल्वेवरच्या मुलांना लग्नासाठी पसंती देत नाहीत, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.


रेल्वे सुरक्षेसंदर्भात हायकोर्टातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना हायकोर्टाने पश्चिम रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे या वादावर टिप्पणी केली. हल्ली पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुली मध्य रेल्वेवरच्या मुलांना लग्नासाठी पसंती देत नाहीत, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं.

या बैठकीला मुंबई पोलिस, जीआरपी, आरपीएफ, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे जीएम उपस्थित होते. जस्टिस विद्यासागर कानडे आणि नूतन सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील
सुनावणीदरम्यान हायकोर्टाने बैठक बोलवली होती.

चर्चगेटहून परेलपर्यंत नवीन ट्रॅक टाकायला जागाच नसल्यानं चर्चगेटहून मध्य रेल्वेसाठी ट्रेन सुरु करणं अशक्य असल्याचं पश्चिम रेल्वेने यावेळी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने चर्चेगेटहून ठाणे-डोंबिवलीपर्यंत मध्य रेल्वे सुरु का करत नाही, अशी विचारणा रेल्वे प्रशासनाला केली होती.

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. फाजिल आत्मविश्वास अपघातांना निमंत्रण देतो, असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी असल्याचा दावा जीआरपीने केला.

दरम्यान रेल्वे फुटओव्हर ब्रिजवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई का होत नाही? असा सवालही हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला विचारला. मुंबई ही अजूनही देशाची आर्थिक राजधानी आहे. दररोज 80 लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात, असंही यावेळी हायकोर्टाने सांगितलं. रेल्वे प्रवाशांची संख्या ही युरोपातील एखाद्या देशाइतकी असल्याचंही कोर्टाने सांगितलं.