मुंबई : मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना एखाद्याला स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या पश्चात प्रियजनांचं काय होईल, याची काळजी वाटणं साहजिकच आहे. मुंबईतील एका आगीच्या घटनेत अडकलेल्या तरुणाला आपल्या जीवाची पर्वा करण्यापेक्षा कुटुंबाला भेडसावणारी आर्थिक विवंचना महत्त्वाची वाटली. म्हणूनच त्याने मृत्यू समोर उभा ठाकला असताना भावाला फोन करुन 'एटीएम पिन क्रमांक' सांगितला.
मुंबईत गोरेगाव पश्चिमेला असलेल्या टेक्निप्लस कॉम्प्लेक्समध्ये रविवारी आग लागली होती. या आगीत अंधेरीतील साकीनाका भागात राहणारा 23 वर्षांचा कामगार अब्दुल रकीब अडकला होता. शेवटच्या क्षणी त्याने केलेला फोन सर्वांचं हृदय पिळवटून टाकणारा ठरला. अब्दुलने आपल्या भावाला फोन करुन 'एटीएम पिन क्रमांक' सांगितला. आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाला कुठल्याही अडचणीविना पैसे काढता यावे, हाच त्याचा उद्देश होता.
अग्निशमन दलाच्या जवानांना अब्दुलचा मृतदेह मंगळवारी सातव्या मजल्यावरील इलेक्ट्रिक रुममध्ये आढळला. आगीतील मृतांचा आकडा पाचवर पोहचला आहे.
शॉर्ट सर्किट झाल्याच्या संशयानंतर अब्दुलसह डझनभर कामगार सातव्या आणि आठव्या मजल्यावरील कार्यालयं रिकामी करत होते. बहुतांश कामगारांना पळ काढण्यात यश आलं किंवा त्यांची सुटका करण्यात आली. मात्र आगीच्या ज्वाळांमुळे अब्दुल कोपऱ्याकडे सरकत गेला आणि दरवाजापर्यंत जाणं त्याला अवघड झालं. नियतीपुढे हार पत्करण्याची वेळ येताच त्याने भाऊ तौफिलला फोन केला.
'मी आगीत अडकलो आहे. मी वाचणार नाही. माझा एटीएम पिन क्रमांक लिहून घे. बँकेच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घे आणि माझ्या कुटुंबाला दे' असं अब्दुल भावाला म्हणाला.
भांबावलेल्या तौफिलने अब्दुलला धीर देण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडण्याचा मार्ग शोध, तू वाचशील, अशा शब्दात त्याला प्रोत्साहन दिलं. 'मी तुझा एटीएम पिन लिहून घेणार नाही. तुला बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागेल. एखादी खिडकी शोध आणि सुरक्षित ठिकाणी उडी मार' असा सल्लाही भावाने दिला.
आपला भाऊ वाचला असेल, अशी आशा तौफिलला होती. त्याने सोमवारी गोरेगाव पोलिसात फोन करुन धाकटा भाऊ बेपत्ता असल्याचं सांगितलं. मात्र मंगळवारी तौफिलला सिद्धार्थ रुग्णालयात बोलवण्यात आलं, तेच मुळी अब्दुलच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी.
अब्दुल उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये लहानाचा मोठा झाला. नोकरीच्या शोधात अवघ्या चारच महिन्यांपूर्वी तो मुंबईला आला होता. अब्दुलच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.
आगीत होरपळ्यापूर्वी त्याने कुटुंबाला 'एटीएम पिन' सांगितला...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2018 10:28 AM (IST)
आपल्या जीवाची पर्वा करण्यापेक्षा कुटुंबाला भेडसावणारी आर्थिक विवंचना महत्त्वाची वाटल्याने गोरेगावच्या आगीत अडकलेल्या अब्दुलने भावाला फोन करुन 'एटीएम पिन क्रमांक' सांगितला.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -