मुंबई:  पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’त त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं.

मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अचानक पत्रक काढून हे मतदान 53.22 टक्क्यांवर गेल्याचं सांगण्यात आलं. मतदानाच्या आकडेवारीत फार फार तर 1 ते 2 टक्क्यांचा फरक पडू शकतो. मात्र ही सहा टक्के मतं एका रात्रीत कुठून वाढली? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर शिवसेनेनं संशय व्यक्त केला आहे.

सोमवारच्या प्रेसनोटमध्ये  8 लाख 4 हजार 950 मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते, तर मंगळवारी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये 8 लाख 87 हजार 687 मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. याचाच अर्थ एका रात्रीत तब्बल 82 हजार 737 इतके मतदान वाढले.

पोटनिवडणुकीत आधीच मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे एक-एक मत निर्णायक असताना एका रात्रीत टक्केवारीचा चमत्कार झाला आणि ती 53.22 वर जाऊन पोहोचली. मतदानाची टक्केवारी रातोरात इतक्या मोठय़ा प्रमाणावर कशी वाढली? ही मते कुणाला तारणार? असे प्रश्न सामनात उपस्थित करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत, पालघरमध्ये 12 तासात 82 हजार मतं वाढली कशी, असा सवाल उपस्थित केला.

त्यामुळे हा EVM चा घोळ आहे, निवडणूक यंत्रणेला हाताशी घेऊन रचलेलं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

तसंच पालघर मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद होते. त्यामुळे इथे जवळपास 50 ते 60 हजार लोकांना मतदान करता आलं नाही. जिथे एक मत प्रभावी असतं, तिथे 50 ते 60 हजार मतदार मतदानापासून वंचित राहणं हे नक्कीच आक्षेपार्ह आणि संशयास्पद असल्याचं संजय राऊत म्हणाले.

पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक   

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला.

याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

याप्रकरणात अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.