ठाणे : ठाणे महानगरपालिकेनं शहरातील रस्ता रुंदीकरण करताना कळवा नाक्यावरील शिवसेनेची शाखा पाडली. मात्र, आता या शाखेची पुन्हा उभारणी सुरु झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


 
एकीकडे नागरिकांची घरं पाडल्यानंतर त्यांना पुन्हा घरं बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. तर शाखा बांधण्यासाठी पुन्हा परवानगी कशी मिळते, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय.

 
एप्रिल-मे महिन्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या शाखेचं बांधकाम पाडण्यात आलं. आता मात्र पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर अनधिकृतपणे बांधकाम सुरु असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय.

 
पालिकेनं सेनेच्या शाखा कार्यालयाचं बांधकाम थांबवलं नाही तर उपोषण करण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. आता शिवसेना याला काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.