मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात नव्याने आरोप केले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवर प्रश्न चिन्हं उभे केले. नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांची बहिण जास्मिन वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे. समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या महागड्या घडळ्यांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांना जास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिले. आपल्या आईने दोन्ही मुलांना महागडी घड्याळं दिली होती, असा दावा जास्मिन वानखेडे यांनी केला. समीर वानखेडे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे जास्मिन वानखेडे यांनी सांगितले.
नवाब मलिक यांनी काय म्हंटले?
समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत 20 हजारांपासून सुरु होते, ती 1 कोटींपर्यंत किमतीची आहेत. एका प्रामाणिक अधिकाऱ्यांचे असे राहणीमान असेल तर सर्व प्रामाणिक लोकांचे राहणीमान असेच व्हावं असेही मलिक यांनी उपरोधिकपणे म्हटले.
"समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजारांचं का आहे? दररोज नवं शर्ट घालून का येतात? वानखेडे तर मोदींपेक्षाही पुढे निघाले. पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाखांचा, शूज अडीच लाखांचे. तर घड्याळं 20 लाखांची, 25 लाखांची. जे कपडे समीर वानखेडेंनी या दिवसांत घातले आहेत, त्यांची किंमतच कोट्यवधी रुपयांची आहे. खरंच, प्रामाणिक अधिकारी 10 कोटींचे कपडे परिधान करु शकते. कोणतंही शर्ट त्यांनी पुन्हा घातलेलं आम्ही पाहिलं नाही." , असं नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांनी आरोप फेटाळले
नवाब मलिकांच्या सर्व आरोपाचं समीर वानखेडे यांनी खंडन केले असून प्रत्युत्तर दिलं आहे. महिनाभरापासून नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप करत पुरावे सादर करत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेले आरोप व्हाया वसूली समीर वानखेडे यांच्या कपड्यापर्यंत पोहचले आहेत. समीर वानखेडे यांनी या सर्व आरोपांचं खंडन केले आहे. माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे, मलिकांना त्याविषयी कमी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असं आव्हान समीर वानखेडेंनी मलिकांना दिले आहे.