आयसिस संशयित रिझवान खानला कल्याणमधून अटक
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2016 07:23 AM (IST)
मुंबई: आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरुन कल्याणमधील रिझवान खान नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. रिझवानवर केरळमधील ख्रिश्चन जोडप्याचं धर्मांतर करुन त्यांना आयसिसमध्ये जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र आणि केरळ एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. कल्याणमधील रिझवान याने केरळमधील काही तरुणांना आयसिसमध्ये जाण्याची मदत करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. दरम्यान, केरळमधून २१ जण सिरीयात गेल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं. मात्र, हे २१ जण नेमके कोण? याबाबत अजूनही काहीही माहिती समजू शकलेली नाही. तर दुसरीकडे याआधीही कल्याणमधून तीन युवक आयसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते.