मुंबई: ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज 160वी जयंती आहे. टिळकांनी दिलेल्या सिंहगर्जनेलाही यावर्षी म्हणजे २०१६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. लोकमान्यांच्या या घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचेतना दिली. मात्र, लोकमान्य टिळकांनी वास्तव्य केलेल्या स्मृतिस्थळांची अवस्था फारच बिकट झाली आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिस्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या स्मृतिस्थळांचा होणारा ऱ्हास, राज्य आणि केंद्र सरकारने थांबवावा. यासाठी ओआरएफचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींना या संदर्भात पत्र लिहलं आहे.
लोकमान्यांनी जेथे अखरेचा श्वास घेतला ते मुंबईतील सरदारगृहाची तर आज पुरती दुरवस्था झाली आहे. सरदार गृहाची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. या वास्तूकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्याचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे.
लोकमान्यांनी जेथे अखरेचा श्वास घेतला ते मुंबईतील सरदारगृह, पुण्यातील टिळक स्मारक आणि रत्नागिरीतील लोकमान्या यांचे जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे. त्यांच्या संरक्षण आणि संवंर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. अशीही मागणी करण्यात आली आहे.