ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला 13 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बालला पोलिसांनी अटक केली आहे.

इक्बालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

27 सप्टेंबरच्या सुनावणीत ठाणे सत्र न्यायालयाने इक्बाल आणि त्याच्या साथीदारांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

गेल्या काही दिवसात इक्बालच्या चौकशीत दाऊद आणि गुन्हेगारीसंदर्भात अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

इक्बालच्या अटकेनंतर डी कंपनीचे शूटर रातोरात अंडरग्राऊंड झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली होती. त्याचसोबत, मुंबईतील संपूर्ण डी गँग इक्बालच्या अटकेनंतर हादरली असल्याची माहिती सूत्रांन दिली. किंबहुना, खुद्द दाऊदनेदेखील भीतीपोटी पाकिस्तानातील ठिकाण बदलले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

याआधी इक्बालने महत्त्वाची माहिती आयबी आणि पोलिसांना दिली. यामध्ये पाकिस्तानातील कराचीमधील क्लिफ्टन भागातील दाऊदचे तीन पत्ते, दाऊदसोबतचा संपर्क यांसह महत्त्वाची माहिती इक्बालने आपल्या चौकशीत दिली. यापुढेही इक्बालच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.