मुंबई: बिहारचा सिंघम अशी ओळख मिळवलेल्या IPS शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रातही धडक कारवाई सुरु केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून, बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली.
बारबाला लपवण्यासाठी बारमालकांनी शौचालयात बनवलेली गुहा शिवदीप लांडे यांनी शोधून काढली.
डान्सबारला बंदी आणल्यानंतर बार मालकांन डान्सबार सुरु ठेवण्यासाठी अनेक शकला लढवल्या आहेत. मात्र कर्तव्य दक्ष पोलिसांपुढे बार मालकाची अक्कल फिकी पडली. काल मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना बारमध्ये पोलिसांनी छापा टाकला.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे गस्तीवर असताना, डान्सबारची माहिती मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या बारमध्ये बारबाला लपवण्यासाठी शौचालयात गुहा तयार करण्यात आली होती. ही गुहा शिवदीप लांडे यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांनी शौचालयातील गुहेची पोलखोल केली.
पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याकरिता बारबालांना या गुहेत लपवले जाते होते. या कारवाईत 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत शिवदीप लांडे?
40 वर्षीय शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे.
29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे.
शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली.
यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.
बक्कळ अनुभव
शिवदीप लांडे यांनी यापूर्वी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्येही पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामाचा बक्कळ अनुभव आहे. शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती. त्यानुसार तीन वर्षासाठी त्यांची बदली करण्यात आली.
पहिली पोस्टिंग
शिवदीप लांडे यांची प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जात होता.
पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. इथेच 2005 साली नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक सुरेंद्र बाबूंची हत्या केली होती. त्यामुळे पोलीस या ठिकाणी जाण्यास घाबरत होते.
मात्र पहिल्याच नियुक्तीत शिवदीप यांनी आपल्या कामाची छाप पाडून, स्थानिकांचा विश्वास मिळवला. प्रत्येक आठवड्यात ते या परिसरात जाऊन स्थानिकांच्या गाठीभेटी घेत. त्यामुळे स्थानिकांचं त्यांना सहकार्य मिळालं. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाली.
शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. धडक कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली. मात्र शिवदीप यांच्या बदलीविरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती.
विजय शिवतारेंचे जावई
“शिवदीप लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्वात दहशत बसवली आहे. अशा अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे. शिवदीपने महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावं अशी आमची इच्छा आहे” असं शिवदीप लांडे यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले होते. शिवतारे हे शिवसेना नेते आहेत. त्यांना आपल्या जावयाचा अभिमान आहे. लांडेंने केलेल्या कारवाईंचे ते अनेकवेळा दाखले देत असतात.
संबंधित बातम्या
पुण्यात 100 कोटींचं ड्रग जप्त, 'सिंघम' शिवदीप लांडेंची कारवाई
बिहारचे सिंघम मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे मुंबई पोलिसात
बिहारमधील मराठी 'सिंघम' शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती
बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुहा, IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2018 09:58 AM (IST)
अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून, बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -