मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर कालपासून (रविवार) देशभरात सर्वत्र केवळ एक्झिट पोलचीच चर्चा सुरु आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलचा कल हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच बाजूने आहे. मोदी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करतील, असे चित्र एक्झिट पोलवरुन दिसत आहे. या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.


कालच्या एक्झिट पोलमुळे आज दिवसभरात सेन्सेक्स 1422 अंकांनी वधारला तर निफ्टीतही तेजी पाहायला मिळाली. निफ्टीचा निर्देशांक 421 अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्स वाध्यारल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 5.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

रविवारी सेन्सेक्स 37 हजार 931 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच तो 946 अंकांनी वधारला आणि 38 हजार 829 अंकांवर पोहोचला. निफ्टीतही अशीच तेजी पाहायला मिळाली. निफ्टीचा निर्देशांक शुक्रवारी 11 हजार 407 इतका होता तो आज सकाळी 20 अंकांनी वधारला.

व्हिडीओ पाहा



लोकसभा निवडणुकीचे निकाल जर खरोखर एक्झिट पोलप्रमाणे लागले तर शेअर बाजारात यापेक्षाही जास्त तेजी येईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. परंतु एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि बहुमताच्या आकड्यासाठी मोठी कसरत करावी लागली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावरह होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलनंतर शेअर मार्केट परिसरातही कुणाची सत्ता येणार, कुणाच्या किती जागा येणार यावरही चर्चा रंगल्या आहेत. अनेक गुंतवणूकदारांचा अंदाज आहे की, एनडीएची सत्ता येईल, पण बहुमताच्या आकड्यासाठी कसरत करावी लागेल. तर अनेक गुंतवणूकदारांना असं वाटतंय की, एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.