Mumbai News : दरवर्षी 20 मार्च रोजी सुरु होणाऱ्या नालेसफाई ऐवजी यंदा 15 दिवस उशीरानं काम सुरु झालं आहे. मागील वर्षी 17 मे ला वादळ आलं आणि नालेसफाई पूर्ण झाली नाही. यावेळीही 15 दिवस उशीरानं नालेसफाई कामाला सुरुवात झाली असून, सर्व कंत्राटदारांना लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे वक्तव्य मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी केले. 15 मे पर्यंत गाळ काढण्याचे टार्गेट दिले आहे. तर 31 मे पर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याच्या सूचना पूर्वी दिल्या असल्याचे चहल म्हणाले. भाजपाने पाठपुरावा केला तेव्हा उशिर झालेले नालेसफाईचे कंत्राट मंजूर झाल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर चहल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
8 मे ला स्थायी समिती आणि महापालिकेची मुदत संपली आहे. प्रशासकाची नेमणूक झाली. त्यानंतर पुढचं काम कसं होणार याबाबत स्पष्टता नव्हती. त्यानंतर सल्ले घेण्यात वेळ गेला असल्याचे चहल म्हणाले. दरवर्षी 20 मार्चला सुरु होणाऱ्या नालेसफाईऐवजी यंदा 15 दिवस उशीरानं काम सुरु झालं असल्याचे चहल म्हणाले. दरम्यान, कंत्राटदारांना लवकरात लवकर काम पूर्ण करणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जर लवकर काम पूर्ण केले तरच त्या कंत्राटदारांना पुन्हा काम दिले जाईल असेही चहल यांनी सांगितले. मुंबईत पाणी तुंबणार नाही असेच काम करण्याचा प्रयत्न राहील. नालेसफाईबाबत नगरसेवकांकडून फिडबॅक मिळत असतो. मात्र, आता नगरसेवकांची मुदत संपल्याने आता जलदगतीनं फिडबॅक मिळावा याकरता भरारी पथकांची नेमणूक केली असल्याचे चहल यांनी सांगितले.
भाजपचे बरेच गैरसमज काल दूर केले आहेत. अनेक टेंडर हे 2 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षीचे टेंडर भाजपनं अहवाल तयार करताना मोजलेले नाहीत असे चहल म्हणाले. हिंदमाताला टॅक तयार आहेत. इतर सुविधाही आहेत. यावर्षी ही खात्री देऊ शकतो की पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणी साचू देणार नसल्याचे चहल म्हणाले.
भाजपाने नालेसफाईच्या कामांची पाहणी हाच 'सेवा सप्ताह' असे जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना मिटींग घ्यावी लागल्याचे आशिष शेलार म्हणाले होते. भाजपाने दौरे सुरु करताच पालकमंत्री जागे झाले, पण अद्याप नाल्यावर उतरले नाहीतच. भाजपाने दौऱ्याचा सविस्तर अहवाल देऊन टास्क फोर्सची मागणी केली. प्रशासनाला मान्य करावी लागली. भाजपाने भयाण वास्तव मांडताच स्वतः पालिका आयुक्तांना पाहणी दौऱ्यास उतरावे लागल्याचे शेलार म्हणाले होते. कमीशनवाल्यांचा कारभार मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून बहुतेक थंड हवेच्या ठिकाणी फरार? असे शेलार म्हणाले होते.