Mumbai Police : जितेंद्र नवलानी यांना दिलासा देत त्यांच्याविरोधात मारहाण आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले. यावर मुंबई पोलिस निरीक्षक अनूप डांगेंनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहले आहे. ज्यामध्ये मुंबई पोलिसांनी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असं म्हटलंय.


मुंबई पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी


पत्रात डांगे यांनी म्हटले आहे की, 12 एप्रिल 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने उद्योजक जितेंद्र नवलानी उर्फ ​​जितू नवलानी यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) रद्द करण्याचे आदेश दिले, त्यावर मुंबई पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी. डांगे यांनी आरोप केलेत की, या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणाचा योग्यरितीने तपास केला नाही, याशिवाय गावदेवी विभागाचे एसीपी किरण काळे व इतर अधिकाऱ्यांनी मुद्दाम जितेंद्र नवलानीला फायदा करून देण्यासाठी विविध तपासात उणिवा ठेवल्या. आणि त्याच्या आधारे हा एफआयआर रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.


जितेंद्र नवलानी प्रकरणाचा योग्यरितीने तपास केला नसल्याचा आरोप
2019 मध्ये मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानीच्या बारवर छापा टाकला तेव्हा जितेंद्र नवलानी यांनी पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखले आणि त्याच आरोपावरून गावदेवी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर 12 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. जितेंद्र नवलानी यांना फायदा व्हावा यासाठी तपास अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कायद्याने घालून दिलेले नियम जाणूनबुजून धुडकावून लावल्याचेही डांगे यांनी पत्रात लिहिले आहे.


उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्यक


याशिवाय, न्यायासाठी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्व तथ्यांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्यक असल्याचेही डांगे यांनी लिहिले आहे. आपल्या पत्रात डांगे यांनी कायद्यातील विविध पैलू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक आदेशांचाही उल्लेख केला आहे आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.