मुंबई : महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली होती. याच्या cascading effect मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.


मुंबईमध्ये आज (12 ऑक्टोबर) सकाळी अचानक अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. आता मुंबई हळुहळु पुर्वपदावर येत असून मुंबई आणि मुंबई उपनगरात वीज पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. रेल्वे तसेच सिग्नल सेवाही हळुहळु सुरळीत होत आहे तर शासकीय कार्यालयांमध्ये वीज पुरवठा सुरु झाला आहे.



वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम


वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परिक्षा आहेत. त्यामुळे वीज गेल्यानं पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परिक्षेचे पेपर सकळी 11 ते 12 या वेळेत आहेत. मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देणं शक्य होणार नाही, त्यांनी चिंता करू नये त्यांची परत परीक्षा घेतली जाईल, असं विद्यापीठाकडून संगण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइलवर परीक्षा देता येत असेल त्यांनी पेपर द्यावा अन्यथा पेपर नंतर घेतला जाईल. त्याबाबत विद्यापीठ लवकरच माहिती देईल. आज दुपारी 1ते 2 दरम्यान सुद्धा पेपर आहेत. पण तोपर्यंत वीज येईल का? त्याबाबत बघून पुढचा निर्णय घेऊ असेही विद्यापीठाने सांगितलं आहे.