मुंबई: 'काही बड्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्षे रखडला.' असा दावा होमगार्डचे पोलीस महासंचालक राकेश मारियांनी केला आहे.


दबाव टाकणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये पीटर आणि इंद्राणी मुखर्जींसोबत अजूनही काही बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं मारियांनी म्हटलं आहे. मात्र त्या बड्या व्यक्तींची नावं घेणं त्यांनी टाळलं आहे.

तब्बल 36 वर्षांच्या सेवेनंतर उद्या राकेश मारिया मुंबई पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत. तसंच शीना बोराच्या हत्येच्या तपासात मोलाची कामगिरी बजावणारे पोलीसही दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सध्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआय करत आहे. मुंबईचे आयुक्त असताना मारियांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं. त्यानंतर काही दिवसातच त्यांची मुंबईच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती.  गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता.

हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती

अपहरण आणि कारमध्येच हत्या

वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जातं.

पतीची फसवणूक

इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं उघड झालं. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं.

इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.

त्या माय-लेकीच

शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.

संबंधित बातम्या:

शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता 'अशी' दिसते



शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'डार्क चॉकलेट'चा ट्रेलर रिलीज