मुंबई: बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. याप्रकरणी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. तो आरोप निश्चित करण्यात आला.


याशिवाय गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे असे आरोप पीटर मुखर्जीवर ठेवण्यात आले आहेत.

एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याला अटक केली. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती तर पीटर मुखर्जीला सीबीआयने अटक केली होती.

पीटर मुखर्जींचं जेलमध्ये आत्मचरित्र

पीटर मुखर्जी सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. त्याचं लेखन पूर्ण करण्यासाठी इंटरनेटविना लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपण दररोज चार तास लेखन करुन लॅपटॉप पुन्हा तुरुंग प्रशासनाकडे देऊ, असं आश्वासन पीटर यांनी दिलं. त्याचप्रमाणे भाचीच्या लग्नासाठी बंगळुरुला उपस्थित राहू देण्याची परवानगीही त्यांनी मागितली होती.

इंद्राणीकडून भगवतगीतेचं भाषांतर

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात आहे. तुरुंगात बसून आपण भगवद्गीतेतील सातशे श्लोकांचा इंग्रजीत अनुवाद केल्याची माहिती तिने कनिष्ठ कोर्टात दिली.

आपण इंग्रजी अनुवाद केलेल्या श्लोकांचं प्रकाशन करण्यात यावं, अशी विनंती इंद्राणीने न्यायाधीशांकडे केली. पुस्तकाच्या विक्रीतून आलेलं अर्ध उत्पन्न इस्कॉनला दान करण्याचा तर उर्वरित रक्कम भायखळा जेलमधील परित्यक्तांना देण्याचा मानस तिने बोलून दाखवला.

काय आहे प्रकरण?

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती.  गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता.

हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती

अपहरण आणि कारमध्येच हत्या

वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जातं.

पतीची फसवणूक

इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं उघड झालं. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं.

इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.

त्या माय-लेकीच

शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.

संबंधित बातम्या
शीना बोरा हत्या : इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना अटक

जेलमध्ये इंद्राणीचा नवा उद्योग, भगवदगीतेचा इंग्रजी अनुवाद

आर्थर जेलमध्ये पीटर-भुजबळांची गट्टी, भुजबळांना मुखर्जींच्या घरचा डबा!

शीनाची हत्या पीटर-इंद्राणीनं लपवली?, 'त्या' फोनकॉल्समुळे नवा खुलासा