मुंबई : जुन्या पाचशेच्या नोटांच्या स्वरुपातील 50 हजारांची रक्कम बँकेत भरु द्या, असा अर्ज इंद्राणी मुखर्जीने सीबीआय कोर्टात केला होता. दरम्यान, गेल्या सुनावणीत कोर्टानंही  तिला यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर तिने रक्कम बँकेत जमा केली आहे.  तर पीटर मुखर्जी यांनी तुरुंगात आत्मचरित्र लिहिण्यासाठी लॅपटॉपची मागणी केली आहे. शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


इंद्राणीनं जुन्या पाचशेच्या नोटांच्या स्वरुपातील 50 हजारांची रक्कम बँकेत जमा करण्याची परवानगी मागितली होती. जेलबाहेर असलेल्या कोणाच्या तरी मदतीने जुन्या नोटा बँकेत भरु देण्याची परवानगी तिने मागितली होती. गेल्या सुनावणीदरम्यान तिला परवानगी देऊन ही रक्कम बँकेत जमा केली गेली.

दुसरीकडे पीटर मुखर्जी सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. त्याचं लेखन पूर्ण करण्यासाठी इंटरनेटविना लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपण दररोज चार तास लेखन करुन लॅपटॉप पुन्हा तुरुंग प्रशासनाकडे देऊ, असं आश्वासन पीटर यांनी दिलं. त्याचप्रमाणे भाचीच्या लग्नासाठी बंगळुरुला उपस्थित राहू देण्याची परवानगीही त्यांनी मागितली होती.

एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याला अटक केली. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.