वसई : जपानमध्ये भारतीय जहाजाच्या झालेल्या दुर्घटनेत वसईतला कॅप्टन बेपत्ता आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राजेश नायर यांचा शोध सुरु आहे.

13 ऑक्टोबरला एमराल्ड स्टार या जहाजाला जपानजवळच्या पॅसिफिक महासागरात जलसमाधी मिळाली. यामध्ये 10 भारतीय खलाशीही बुडाले. वसईमध्ये राहणाऱ्या राजेश नायर यांचाही दहा जणांमध्ये समावेश आहे. हाँगकाँग आणि जपानच्या समुद्रकिनारी भागात नायर यांच्यासह 10 खलाशांचा शोध सुरु आहे.

हॉंगकॉंग आणि जपानच्या कोस्ट गार्ड टीमकडून शोध मोहीम सुरु आहे. हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली आहे. 33 हजार 205 टनच्या या जहाजातून केमिकल वाहून नेलं जात होतं.

इंडोनेशियातून चीनला जात असताना अचानक जहाज बुडू लागलं. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या तीन जहाजांनी या जहाजातील 16 जणांना वाचवलं. मात्र दहा जणांना वाचवता आलं नाही.

13 ऑक्टोबरला राजेश बेपत्ता झाल्याची बातमी समजताच संपूर्ण कुटुंब, मित्र परिवार चिंतेत आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वतः राजेश यांच्या पत्नी रश्मी यांच्याशी बोलल्या आहेत. राजेश नायर यांना आठ वर्षांचा वेदांत आणि तीन वर्षाची इशिता ही मुलं आहेत.