मुंबई : आपल्या विभागातील पोस्टमनची संपूर्ण माहिती देणारे 'पोस्टमॅन व्हर्च्युअल कार्ड' मुंबई पोस्ट कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहेत. या कार्डचे अनावरण आज उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय पोस्ट सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमा निमित्ताने आज या व्हर्च्युअल कार्डचं अनावरण करण्यात आलं. तसंच पोस्टाच्या तिकिटांचे फोटो असणाऱ्या मास्कच्या वितारणाला आजपासून सुरुवात झाली आहे.
9 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय पोस्ट दिवस साजरा केला जातो. त्याअंतर्गत संपूर्ण आठवडा विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. आज राष्ट्रीय मेल दिवस आहे. याचाच एक भाग म्हणून आज पोस्ट कार्यालयाच्या वतीने आपल्या विभागात येणाऱ्या पोस्टमनची आपणास संपूर्ण माहिती असावी. त्याचं पूर्ण नाव, त्याचा संपर्क क्रमांक आपल्या जवळ असावा यासाठी पोस्ट विभागाच्या वतीने आपल्या विभागातील 'पोस्टमन व्हर्च्युअल कार्ड' तयार करण्यात आलेले आहे. या कार्डचे अनावरण आज उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी रतन टाटा ज्या परिसरात राहतात त्या कुलाब्यातील त्यांच्या पोस्टमनची माहिती देणारे पोस्टमन व्हर्च्युअल कार्ड रतन टाटा यांना वितरित करण्यात आलं. रतन टाटा यांच्या विभागाचा नंबर 9 आहे. तर त्यांच्या पोस्ट मनचे नाव आहे V.D. मारिया. व्हर्च्युअल कार्डमुळे पोस्टमनशी आपली अधिक जवळीक वाढणार आहे. पोस्ट संदर्भातल्या सेवा, बँकिंग सेवा यासह अन्य सेवा पुरविण्यासाठी पोस्टमॅन आपली मदत करणार आहे. त्यामुळे हे कार्ड महत्त्वाचं ठरत आहे.
भारतीय पोस्ट विभागातील पोस्ट तिकीटांची चित्र असलेला एक सुंदर मास्क मुंबई पोस्ट विभागाने आज लॉन्च केलेला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये मास्क घालणं हे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे अनेकजण पोस्टाची तिकीट संग्रह म्हणून ठेवत असतात. तसंच पोस्टाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या मास्क वर पोस्टाच्या प्रसिद्ध तिकिटांचे फोटो लावून हा मास्क तयार करण्यात आलेला आहे. या मास्कचं आज नागरिकांसाठी वितरण खुलं करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये हे मास्क 75 रुपयाला उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
तळकोकणातील सावंतवाडीमधील लाकडी खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान, देशभरातील बारा हस्तकलांचा समावेश
कोरोनाच्या कालावधीमध्ये डॉक्टर्स आणि पोलिसांबरोबरच पोस्ट विभागातील पोस्टमन यांनी देखील रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या सेवे प्रित्यार्थ हे मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
स्वाती पांडे (पोस्ट मास्टर जनरल, मुंबई विभाग प्रमुख)
आंतरराष्ट्रीय पोस्ट सप्ताह निमित्ताने मुंबई पोस्ट विभागाच्या वतीने संपूर्ण आठवडाभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण मुंबई विभागातील सहा हजार कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते पोस्टमन व्हर्च्युअल कार्डचे अनावरण आहे. तसेच मुंबईकरांना नेहमीच पोस्टाच्या तिकिटांचा आकर्षण राहिलेले आहे. हीच बाब ओळखून आम्ही या तिकिटांचे फोटो असणारे मास्क तयार केले असून ते मुंबईकरांसाठी आजपासून वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे. मुंबईतील अडीचशेहून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये हे मास्क मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पोलीस आणि डॉक्टर्स अहोरात्र काम करत होते. त्याच पद्धतीने पोस्टमन देखील रस्त्यावर उतरून काम करत आहेत. या सर्वांच्या सेवा प्रित्यार्थ आम्ही हे खास मास्क बनविलेल्या आहेत. मुंबईकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.