मुंबई : मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार आणि विद्यमान भाजप नेते मंगेश सांगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत सांगळेंना अटक न करण्याचे आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने  मंगळवारी दिले आहेत. विनयभंग प्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली सेक्टर-8 ए मधील 'यश पॅराडाईज' इमारतीत राहणाऱ्या मंगेश सांगळेंनी ऑक्टोबर 2018 मध्ये 19 वर्षीय पीडित तरुणीला आपल्या घरी कामानिमित्त बोलावून घेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर मंगेश सांगळे यांनी दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीला मेसेज पाठवून याबाबत कुणाकडे वाच्यता न करण्याची विनंती केली होती.
घडलेल्या प्रकारानंतर या तरुणीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून सांगळे यांनी ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलाय. त्यानंतर सांगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.